Pune News भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांची नावे पुढे येत आहेत. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील. तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील एका तरूणानंही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरूण उमेश म्हेत्रेनं थेट भारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना त्यांनी नवी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १५ हजार रूपयांचे रूपयांचे डिपॉझिट जमा केले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गावातील एका साध्या तरूणानं थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे.
उमेश म्हेत्रेनं याआधी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरताना १० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असतं. अशा स्थितीत आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र नसेल तर, हा अर्ज बाद केला जातो. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता.
