पुणे प्रतिनिधी (Pune news) बाणेर भागात एका रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी घेऊन जात असल्याचे सांगून रिक्षात बसवले. मात्र, त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला.
वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोपाळ गोविंद वाघ (६३) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अमितकुमार (वय ३५, रा. एन पी अटलांटिस, ज्युपिटर हॉस्पिटलमागे, बालेवाडी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास गोपाळ वाघ हे काही कामानिमित्त बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पत्नीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत ते घरी परतले नाही. त्यानंतर वाघ कुटुंबीयांनी नातेवाईक, तसेच निकटवर्तीयांकडे चौकशी केली. वडील घरी न परतल्याने वाघ यांचा मुलगा अमितकुमार हे तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात गेले.
अमितकुमार हे पोलिसांसोबत बालेवाडी फाटा परिसरात गेले. त्यांनी बालेवाडी फाटा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा चौकातील न्यू पूना बेकरीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या वाघ यांना रिक्षाचालकाने धडक दिल्याचे दिसून आले. चित्रीकरणात वाघ हे जखमी झाल्याचे आढळले. अपघातानंतर तेथे गर्दी झाली. नागरिकांकडून चोप बसेल, अशी भीती वाटल्याने रिक्षाचालकाने वाघ यांना रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे नागरिकांना सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील वाघ यांना बालेवाडी फाटा परिसरातून रिक्षातून घेऊन विरुद्ध दिशेने बाणेरकडे रिक्षाचालक गेला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता.