नवरा बायकोच्या वादात खरातने साधला डाव, अटकेच्या 10 दिवसांनी नवा कांड उघड

Pune नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून आता १० दिवस उलटले आहेत. त्याच्या अटकेनंतर त्याच्या काळ्या कृत्यांची अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्याने शोषण केलेल्या महिला, त्याने लुटलेले लोक आता समोर येत अशोक खरात विरोधात फिर्याद दाखल करत आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा अशोक खरात विरोधात दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या नवीन गुन्ह्यांमुळे अशोक खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

‘व्यवसायात बरकत येईल’ सांगून लाखो रुपयांचा गंडा
नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत यांनी अशोक खरात विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. खरातने भागवत यांना त्यांच्या व्यवसायात मोठी बरकत होईल आणि प्रगती होईल, असं आमिष दाखवलं. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या ‘चमत्कारी’ अंगठ्या लाखो रुपयांना विकल्या. मात्र, कोणताही फायदा न होता उलट आर्थिक नुकसान झाल्याचं लक्षात आल्यानंतर भागवत यांनी पोलिसांत धाव घेतली.

पती पत्नीचा वाद अन् खरातने साधला डाव
दुसऱ्या प्रकरणात, एका विवाहित महिलेनं खरातवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत वाद होत होते, त्यावर उपाय विचारण्यासाठी ती आपल्या पतीसह खरातकडे गेली होती. याचा फायदा घेत आरोपी खरातने विवाहितेचं लैंगिक शोषण केलं. खरातने तिला सांगितले की, “मी साक्षात महादेवाचा अवतार आहे. माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तुझ्यावरील सर्व संकटे दूर होतील.” इतकेच नव्हे तर, तिने नकार दिला असता, “तुझ्या मुलांचा आणि पतीचा मृत्यू होईल,” अशी भीती घालून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

खरं तर, अशोक खरातला अटक करून आता दहा दिवस उलटले आहेत. तरीही त्याचे कांड समोर येण्याचं थांबत नाहीयेत. जसा जसा त्याचा भोंदूपणा समोर येत आहे, तसं तसं लोकही समोर येत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहेत. अजूनही इतर कुणावर खरातने असा अत्याचार केला असेल अथवा फसवणूक केली असेल तर त्यांनी पुढे येऊन फिर्याद दाखल करावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक शोषणाच्या सर्व तक्रारींमध्ये खरातने एकच ‘मोडस ऑपरेंडी’ वापरल्याचं समोर आलं आहे. आध्यात्मिक भीती दाखवून महिलांचे शोषण करणं हा त्याचा अत्याचाराचा पॅटर्न समोर आला आहे. सध्या नाशिकमध्ये या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, खरात विरोधात तक्रारींचा ओघ अजूनही सुरूच आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही पीडित महिला समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.