हिंजवडी मेट्रो धावणार कधी ? मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेसचा सवाल

Pune हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबद्दल आश्वासने देण्यापेक्षा हिंजवडी मेट्रो धावणार कधी? ते सांगा, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार हे पिंपरी-चिंचवड भागाला भेट देतात. तेव्हा हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात, असा आजवरचा अनुभव आहे. हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सध्याचा शासकीय कारभार पहाता प्रत्यक्ष रस्ते होण्यासाठी ३-४ वर्षांचा कालावधी लागेल. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट झाला असून तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या, रहिवाशांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या सर्व चाचण्याही झालेल्या आहेत. मेट्रो प्रशासनाच्या मते तांत्रिक बाबी पूर्ण करून ३१ मेपूर्वीच मेट्रो धावू लागली असती. परंतु भाजप सरकारकडून मेट्रोला हिरवा कंदील मिळत नाही. भाजपला उद्घाटनाच्या निमित्ताने मिरवून घ्यायचे आहे, म्हणून मेट्रो थांबवली आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देण्यापेक्षा अजून वेळ न घालवता हिंजवडी मेट्रो त्वरित चालू करावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.