कल्याणमध्ये भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवलं

Pune एका पीडित तरुणीला मदतीचे आमिष दाखवून भिवंडीतील बापगाव येथील फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला शस्त्राचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मदतीच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेले

२२ वर्षांच्या पीडित विवाहित तरुणीचा पतीसोबत वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार, बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील एका खाजगी मालमत्तेत आणले. तेथे तिला शस्त्राचा धाक दाखवून आणि दारू पाजून शारीरिक अत्याचार केले. रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील यानेही पीडित तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटीलच्या घरच्या केअरटेकरने पीडित तरुणीला तिच्या घरी आणून सोडले.

नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने गुन्हा दाखल

घाबरलेल्या पीडित तरुणीने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळी तिने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांनी अत्याचार केल्याचे सांगून, त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि मोबाईल व्हॉट्सॲप चॅट दाखवले. त्यानंतर पीडित तरुणीला सोबत घेऊन कांचन कुलकर्णी रात्री पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.- पीडित तरुणी”पोलिसांनी आता मला न्याय द्यावा; यांनी अशा प्रकारे आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल, त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा व्हावी.”

काय म्हणाल्या कांचन कुलकर्णी?

“पीडित तरुणीने माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील नंबरवर संपर्क साधून मदत मागितली होती. मी तिला भेटले असता तिने सांगितलेली घृणास्पद हकीकत ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिच्याजवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट पाहिल्यानंतर मी तत्काळ तिला सोबत घेऊन रात्री पडघा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस महासंचालकांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी रात्री उशिरा सर्व बाबींची खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे,” असे कांचन कुलकर्णी म्हणाल्या.