बीड – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना बीड जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या १८ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत असून, यंदा नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा सूर पदवीधर मतदारांमधून उमटत असल्याचे बोलले जात आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या १८ वर्षांत पदवीधरांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न अपेक्षेप्रमाणे मार्गी लावले नसल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे. शिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, पदवीधरांच्या समस्या आणि मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यांवरून त्यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही परिवर्तनाची चर्चा जोर धरू लागली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात सक्रिय होत पदवीधरांशी संवाद वाढवला आहे. त्यांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. विशेषतः नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेतून पदवीधर मतदार त्यांच्या पाठीशी एकवटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बीड जिल्हा ठरणार निर्णायक?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बीड जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सतीश चव्हाण यांच्या प्रदीर्घ कार्यकाळाबाबत व्यक्त होणारी नाराजी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या पथ्यावर पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा सूर प्रत्यक्ष मतदानात किती प्रभावी ठरतो, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे…
