रुपाली ठोंबरेंची राजकीय दिशा अखेर ठरली; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Pune news अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर रुपाली ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या रुपाली ठोंबरे नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्क वितर्क लढवले जात असून आता ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर दोन फोटो पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच भविष्यातील राजकीय वाटलाचीबद्दल संकेत दिले आहेत. रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं की, “पहिला फोटो 2005 मधील आहे बरं का. तेव्हापासून समाजात, राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली. दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ, दिग्गज नेते, जबरदस्त आवडते नेते हिंदुह्रदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. शरदचंद्र पवार साहेब. त्यामुळे आयरे गैरे नथू खैरे,नटरंगी लोकांनी शिकवू नयेच,” असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.