Pune मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीची आचारसंहिता येत्या २४ तासांत जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जळपास पूर्ण केली आहे.
निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकाल कधी?
मागील काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. मतदारयादीदेखील अंतिम करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुका या एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. तर, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, त्यामुळेच मधल्या दिवशी मतदान घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता आहे. तर, १५ जानेवारीनंतरचा आठवडा हा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (शु्क्रवार), चौथा शनिवार-रविवार असा लाँग वीकेंड असणार आहे. त्यामुळेच १५ जानेवारी मतदान होणार असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
