Pune Update News कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाला आता एक मोठे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विठ्ठल शेलार याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी विठ्ठल शेलारला ताब्यात घेतले होते, मात्र ही अटक करताना आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता. कोणत्याही व्यक्तीला अटक करताना जे नियम पाळणे बंधनकारक असते, ते या प्रकरणात पाळले गेले नाहीत, असा युक्तिवाद न्यायालयात मांडण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत शेलारची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोथरूड परिसरात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मोहोळवर तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेनंतर मोहोळच्या हत्येचा कटात विठ्ठल शेलार सामील असल्याचा संशय पोलिसांना होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले होते आणि पोलिसांनी वेगाने हालचाली करत अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र आता शेलारची सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
