वसंतदादांचे सरकार मी पाडले’, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली

पुणे संसदेचे अधिवेशन सुरू होऊन १४ दिवस झाले, मात्र एक मिनिटही कामकाज चालले नाही. ही स्थिती चिंताजनक आहे. देशाची एकता लोकशाही टिकवायची असेल तर महात्मा गांधी नेहरू यांचा विचार मानणाऱ्यांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

देशभरातील ३०० खासदार एकत्र येऊन मोर्चा काढतात, तर त्यांना अटक केली जाते असे ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते, माजी आमदार उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते उल्हास पवार यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ औसेकर, माजी आमदार धीरज देशमुख, साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे उपस्थित होते. पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार यांचा डॉ. ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद पवार यांनी यावेळी जुन्या राजकीय वातावरणाच्या आठवणी जागवल्या व सद्य राजकीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त केला. सत्कारमुर्ती उल्हास पवार यांनीही त्याला दुजोरा देत सध्याच्या राजकारणाने व राजकीय व्यक्तींनीही पातळी सोडली असल्याची टिका केली.

वसंतदादांचे सरकार मी पाडले

शरद पवार यांनी सांगितले की, ज्यांनी देशाचे नेतृत्व केले, घरादाराचा विचार केला नाही, पंचशील सारखे तत्व जगाला दिले, त्यांचे नावही घेतले जात नाही. हे सगळे अस्वस्थ करणारे आहे. ज्या वसंतदादा यांचे सरकार मी पाडले, त्याच दादांनी पुढे १० वर्षांनंतर पक्षात नेतृत्वाचा विचार आला त्यावेळी माझे नाव घेतले. असा विचार करणारे नेते होते. आता द्वेषाचे, सुडाचे राजकारण केले जाते.