कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने का बजाविली नोटीस ?
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा’ (शो-काॅज) नोटीस बजाविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात ही नोटीस बजाविण्यात आली असून ठाकरे यांना दोन डिसेंबर रोजी आयोगासमोर समक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोगाला अर्ज केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २४ जानेवारी २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. त्यानुसार १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचाराचा कट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रचला होता,’ असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी अर्जात म्हटले आहे. आंबेडकर यांनी या अर्जासमवेत एक बातमीही जोडली होती.
त्यामध्ये ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच फडणवीस सरकारवर कट रचणाऱ्यांना संरक्षण देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्राची प्रत संबंधित कागदपत्रांसह आयोगाला सादर करावी, अशी विनंतीही आंबेडकर यांनी आयोगाकडे केली होती.
