Pune news Asim Sarode News: बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय चर्चा आणखी तीव्र झाली आहे.
राम खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही आमदार सुरेश धस यांच्यावर थेट आरोप केले होत. खाडे यांनी उघड केलेल्या जमीन प्रकरणामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. त्यातच वकील सरोदे यांनी केलेल्या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना असीम सरोदे (Asim Sarode) म्हणाले, “हजारो एकर देवस्थानची जमीन भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून खासगी मालमत्तेसारखी दाखवण्यात आली. त्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अनेक देवस्थानांच्या जमिनी बळकावल्या. त्या जमिनींवर प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकले. हा खूप मोठा आर्थिक घोटाळा आहे. हे सर्व प्रकरण राम खाडे यांनी समोर आणले होते,” असा दावा सरोदे यांनी केला. राम खाडे यांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी प्रशासन आणि पोलीस विभागावरही अपेक्षेच्या नजरा लागल्या आहेत.
