दलित असल्यामुळेच सरन्यायाधीशांवर हल्ला; आठवले यांचा दावा
मुळशी प्रतिनिधी -: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा ते दलित असल्यामुळेच झाला आहे, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भूषण गवई हे स्वतःच्या मेहनतीने सरन्यायाधीश झाले.
पण सवर्ण समाजातील काही लोकांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे आठवले म्हणाले, काल ते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे बोलत होते,
यावेळी आरपीआयचे पुणे जिल्ह्याचे युवा नेते विशाल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. याप्रसंगी भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हुलावळे, परशुराम वाडेकर, मुळशी तालुक्यातील आरपीआयचे तालुकाध्यक्ष आजी-माजी नेतेमंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंध व्यक्तींना मोफत 1000 काट्यांचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना 5000 हजार पॅडचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.
सरन्यायाधीश गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न
या घटनेचा निषेधही केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी ताबडतोब फोन करून याची माहिती घेतली आणि या घटनेचा निषेध केला. मीही या घटनेचा निषेध करतो. आधीच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे दलित असल्यानेच त्यांच्यावर सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊन कारवाई व्हावी. कुठल्याही दलितांवर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, असा प्रयत्न मी करीन, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जिंकणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय पार्टी महायुती मिळून लढणार आहोत आणि बहुतांश ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला खूप मोठे यश मिळाले.
तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्हाला मोठे यश मिळणार आहे, मुळशी पंचायत समितीत आपल्या हक्काचा विशाल शेळकेला पाठवायचे आहे त्यामुळे सर्वांनी काम सुरू करावे असा आशावाद केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
