Tejasvee Ghosalkar सासरे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान; भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तेजस्वी घोसाळकर कोण?

Pune शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत तेजस्वी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.

तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबै बँकेवर त्यांची संचालक म्हणूनही वर्णी लागली होती. यामुळे त्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

तेजस्वी घोसाळकर यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची २०२४ च्या फेब्रुवारीत गोळ्या झाडून हत्या झाली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबै बँकेचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर तेजस्वी घोसाळकर यांना संचालक करण्यात आले. दरम्यान, मुंबै बँकेवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे. त्यांनीच तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी नियुक्ती केली.

मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती होण्याआधी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवेसनेच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा तेजस्वी यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी तेजस्वी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती.