पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ, जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “ऋतुरंग” चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अण्णा भाऊ साठे सभागृह, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला दूरदृष्टी चित्रकार चिंतामणी हसबणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा कला अध्यापक संघाच्या अध्यक्षा व नगरसेविका अश्विनी कदम होत्या.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ४५ शाळांतील १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवड झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चित्रकार चिंतामणी हसबणीस यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचा आत्मा समजावून सांगताना म्हटले की, “चित्रकला ही कोणत्याही भाषेची मोहताज नसून ती स्वतःच एक जागतिक भाषा आहे. ही कला विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाला आराम देणारी आणि आनंद देणारी आहे.”
अध्यक्ष अश्विनी कदम म्हणाल्या, “चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थी नव्या उंचीवर पोहोचतात.” संघटनेतर्फे लवकरच विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव कदम यांनी केले तर आभार महेश मोरे यांनी मानले.
या वेळी जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव सुनील बोरले, उपाध्यक्ष गजानन लोणकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे गणेश घोरपडे, निताली हरगुडे, चंद्रकांत कोकाटे, प्राचार्य दशरथ घोगरे, सुवर्णा गायकवाड, भीमराव बारवकर, संदीप जाधव, सुधीर बोत्रे, मारूती पवार, शितल चोपडे, मनिषा तांबे, शेंडे सर, हरिहर मॅडम, नवनाथ अडसूळ, नवनाथ कुंभार, दिपाली भोसले तसेच राज्यातील अनेक नामवंत कला शिक्षक उपस्थित होते.