काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

Pune देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. शिवराज पाटील हे लातूरमधील चाकूर येथील प्रभावी काँग्रेस नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजय मिळवला होता.

चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते.

मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली. चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते. डॉक्टरांची टीम देखील सोबत होती.

5 डिसेंबरपासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखी खालावली होती, अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.

अशा परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची चाचपणीही केली होती.

मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसरीकडे शिफ्ट करणे योग्य नसल्याचा सल्ला दिला. त्यामुळे चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. शनिवारी (13 डिसेंबर) बोरवटी गावातील त्यांच्या शेतात 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.