माजी खासदार संजय पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून रान उठवून भाजपवर डाव टाकला आहे. तर माजी खासदारांच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचा पट मांडला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुका रंगतदार होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत भाजपपासून फारकत घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मात्र याही निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर संजय पाटील राजकीय विजनवासात गेले. सलग दोन निवडणुकांत झालेल्या पराभवात विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांनी दिलेल्या धोक्याची सल माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांना पोहोचत राहिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादीपासून फारकत घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला.
तसेच ‘विकास आघाडी’च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. अर्थात, ही घोषणा करत असतानाच या निवडणुकीत कोणाशी हातमिळवणी करणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले. दरम्यान, निवडणुकीची भूमिका जाहीर केल्यानंतर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर शुक्रवारी कर्जमाफीच्या मागणीसाठी सांगलीत लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एकंदरीत संजय पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत असणाऱ्या भाजपवर डाव टाकून आगामी निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी रचना आखली असल्याचे दिसून येत आहे.
