Sahar Shaikh : ‘कैसे हराया’ विचारणाऱ्या सहर शेखचा गेम ओव्हर?

Thane ठाणे महापालिका निवडणुकीतकैसे हराया’ या एका वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या एमआयएम (MIM) नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा खळबळजनक अहवाल ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे.

या अहवालामुळे सहर शेख यांचे नगरसेविका पद आता टांगणीला लागले असून, त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार जावेद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे नेमका घोटाळा?
तक्रारदार सिद्दिकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहर शेख यांच्या जात दाखल्याच्या वैधतेवर आक्षेप घेतला होता. तक्रारीनुसार, सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर, नियमानुसार त्यांना ‘नमुना १०’ लागू असताना, त्यांनी अधिकार्‍यांची दिशाभूल करून ‘नमुना ८’ चा वापर केला. याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गाचा (OBC) बनावट दाखला मिळवला. याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला.

प्रशासकीय सुनावणीत धक्कादायक बाबी समोर
या प्रकरणाची १८ मार्च रोजी झालेली सुनावणी युनूस शेख यांनी आजाराचे कारण देत टाळली होती. मात्र, २३ मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सुनावणीत ठाणे तहसीलदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी काढल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, जर सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी होत्या, तर त्यांनी जातीचा दाखला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून का घेतला? यामागे यंत्रणांची दिशाभूल करण्याचा उद्देश होता का, याची आता चौकशी सुरू आहे.

गुन्हा दाखल करण्याची शिफारस
तहसीलदारांनी दिलेल्या अहवालानुसार, उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समितीने सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. जात प्रमाणपत्र सादर करताना कागदपत्रांची फेरफार किंवा चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.