अजितदादांनंतर पुण्यातून दु:खद बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांचं निधन

Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (Ajit Pawar) आता महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशातच पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे.

76 व्या वर्षी अखेरचा श्वास
शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

पुण्याचे महापौरपद भूषवलं
शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौर पद अत्यंत प्रभावीपणे भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महापौर म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले. एक संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती.