धायरी प्रतिनिधी :: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे ही घटना घडली. सचिन हंगे (वय ३९, रा. धायरी) असे त्या मृत शिक्षकाचे नाव आहे.
त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी हंगे हे दुचाकीने धायरी फाटा ते नऱ्हे दरम्यान असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरून जात होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात लपलेला मोठा खड्डा त्यांच्या नजरेस न पडल्याने त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. डोक्यावर गंभीर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. जवळच असलेल्या डॉ. किरण भालेराव यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष!
नऱ्हे परिसरातील रस्ते महापालिकेच्या अखत्यारित गेल्यानंतर अनेकदा खड्ड्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यानेच हा जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हंगे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.