अहिल्यानगर प्रतिनिधी :: निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांकरिता केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने ५ हजार २३ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली. त्यामुळे केंद्र सरकारकडून या निळवंडे प्रकल्पास निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
निळवंडे कालव्यांसह वितरिकांची कामे आता वेगाने पूर्ण होतील, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, की या समितीची बैठक केंद्रीय जलसंसाधन मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी निधी देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
हा निधी मिळावा यासाठी आपण पाठपुरावा करीत होतो. केंद्रीय समितीच्या मान्यतेमुळे निळवंडे प्रकल्पास केंद्र सरकारकडून निधी उपलब्धतेचा मार्ग मोकळा झाला. सुमारे ५ हजार २३ रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याने कालव्याच्या उर्वरित कामांना निधी उपलब्ध होईल.
या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात निळवंडे धरण, ७० किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आणि ८५ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारने निळवंडेच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम मार्गी लागले.