pune news अजित पवार हे सोमवारी एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी झापलं.
गोल्डमॅन बरेच प्रसिद्ध आहेत. मात्र अजित पवार यांनी या गोल्डमॅनना सोन्याचे दागिने घालण्यावरून सुनावलं. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी त्या भानगडीत पडू नये असं अजित पवार म्हणाले.
सोन्याचं वेड हे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच असतं. सुरुवातीपासूनच ही परंपरा चालत आलीय. पण अधुनिक काळात जीवनशैली बदलली आणि लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतायत. अडीअडचणीला सोनं बँकेत गहाण ठेवून नड भागवता येते. पण आपल्याकडे काही लोकांची गोल्डमॅन म्हणूनही ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडेही शिवले. हे मात्र जरा अती होतंय असंही अजित पवार उद्घाटनावेळी म्हणाले.
पुरुष मंडळींना मी एवढंच सांगेन की सोनं हे आई, पत्नी, बहीण आणि मुलींच्या अंगावरच शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही सोनं घातलं तर बैलाच्या गळ्यात साखळी घातल्यासारखं दिसतं ते. अर्थात सोनं ते त्यांच्या पैशाने घालत असले तरी पण सोन्याकडे आपण स्त्रीधन म्हणून पाहतो आणि ते त्यांनाच दिलं तर चांगलं होईल अशीही टिप्पणी अजित पवार यांनी केली.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पूरस्थितीबाबत भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, सर्व मंत्री पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात गेले होते. त्यावेळी काही ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोधही बघायला मिळाला. शेतकऱ्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं होतं, शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे साहजिकच अशा प्रतिक्रिया येतात. त्यांनी संताप व्यक्त केला तरी आम्ही त्यांना कशी मदत करता येईल त्यासाठी काय निर्णय घअयायचा ते ठरवलंय. केंद्र सरकारकडेही जास्ती जास्त मदत मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
