पुण्यात ठाकरेंना मिळाला नवा शिलेदार सर्वांना धक्का देत मिळवला मोठा विजय

Pune 

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अखेर पुण्यात आपला ‘भोपळा’ फोडला आहे. हडपसर भागातील प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेचे (UBT) उमेदवार नितीन गावडे यांनी विजय मिळवला आहे.

पुण्यातील शिवसेना (UBT) पक्षाचा पहिला अधिकृत निकाल असून कार्यकर्त्यांमध्ये काहीसे हायसे वातावरण आहे.

हडपसरमध्ये ‘मशाल’ धगधगली

हडपसर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पक्षातील फुटीनंतर या जागेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. नितीन गावडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कडवी झुंज देत ही जागा खेचून आणली आहे. त्यांच्या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुण्यात आपले अस्तित्व असल्याचे दाखविले आहे.

पुण्यात एकामागून एक भाजपचे उमेदवार निवडून येत असताना, हडपसरमधील या विजयाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याच्या १६५ जागांपैकी शिवसेना (UBT) ने जिंकलेली ही पहिली जागा आहे. भाजपच्या झंझावातामध्ये आता वसंत मोरेंची एकच जागा आणखी एक दिलासा देण्याची शक्यता आहे.