pune news पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचे भवितव्य पुढील दीड महिन्यांत ठरणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ लेनच्या २ भुयारी मार्गांसाठी तब्बल ७,५०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कितपत कमी होणार, रस्त्यावरील गर्दी किती कमी होणार, याचा सध्या शास्त्रीय अभ्यास सुरू आहे.
भुयारी प्रकल्पासाठी पीएमआरडीएने मोनार्क एजन्सीची नेमणूक केलीआहे. ही एजन्सी पुढील दीड महिन्यांत आपला सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. या अहवालावर आधारितच प्रकल्प राबवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
वाहतुकीवर अभ्यास सुरू
या प्रकल्पाचा प्रचंड खर्च लक्षात घेत, त्याची उपयुक्तता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संबंधित मार्गावर दररोज किती वाहने धावतात, कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते? तसेच भुयारी मार्ग तयार झाल्यास किती प्रमाणात गर्दी कमी होईल, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. पीएमआरडीने निविदा प्रक्रियेनंतर हे काम पुण्यातील मोनार्क एजन्सीला हे काम सोपवलं आहे.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाची उपयुक्तता तपासण्यासाठी मोनार्क एजन्सी ३ महिने अभ्यास करणार आहे. दीड महिन्यांपासून या मार्गावर प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरूये. उर्वरित दीड महिन्यात अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच भुयारी मार्गाचा प्रकल्प राबवायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.
पुणेकरांच्या सोयीसाठी रिंगरोड, महामार्ग जोडणीसह विविध प्रकल्प सुरू आहेत.यामध्ये सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणून येरवडा – कात्रज भुयारी मार्गाला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्या पुढाकाराने सुरू झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
