Pune University SET Exam 2025 – : राज्य पात्रता परीक्षा ‘सेट’ही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील अटक आरोपींनी पोलिस चौकशीत सेट परीक्षेचाही प्रश्नपत्रिका फुटल्याची कबुली दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
त्यामुळे पुणे विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या पात्रता परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले याप्रसंगी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, पुणे संपर्कप्रमुख शिवम बालवडकर, शहर उपाध्यक्ष रोहन कोकाटे, यांच्या उपस्थितीत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले व काही ठोस मागण्या करण्यात आल्या.
काय आहेत मागण्या
1. सेट विभागातील समन्वयक, अधिकारी आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांची स्वायत्त, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी.
2. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
3. भविष्यात अशाप्रकारचे प्रकार टाळण्यासाठी SET परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचे टेक्निकल ऑडिट, सुरक्षा पुनरावलोकन आणि नवी पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
4. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठाने स्पष्ट, तातडीचे आणि विश्वास देणारे अधिकृत निवेदन जारी करावे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी सेट परीक्षा आयोजित करते. जून 2025 मधील परीक्षेला दोन्ही पेपरसाठी तब्बल 90 हजारांहून अधिक उमेदवार बसले होते, त्यापैकी सुमारे 6 हजार उमेदवार उत्तीर्ण ठरले. नेहमीप्रमाणे 5 ते 6 टक्के निकाल लागला असला तरी मागील काही वर्षांत पेपरफुटी व इतर अनियमिततेचे आरोप सतत समोर येत आहेत.
११ जून 2025 रोजी सोशल मीडियावर एका यूट्यूब चॅनलवरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. यात ‘सेट’ पेपर फुटीचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेऊन विद्यापीठाने यूट्यूबरविरुद्ध खोटी माहिती पसरवल्याचा गुन्हा दाखल केला आणि सर्व आरोप फेटाळून लावणारे निवेदनही जारी केले.
