पुणे () सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भोजन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २२ जुलै रोजी विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, हे प्रकरण नवीन नाही. याआधीही अनेक वेळा जेवणात अशा अस्वच्छ प्रकारांची पुनरावृत्ती झाली असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी वसतिगृहात उंदरांचा व ढेकूणांचा त्रासही मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठातील भोजन व्यवस्था, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.
विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कडक पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.