सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवार (ता.२०) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.पहिल्या टप्प्यात राजभवन ते आरबीआय गणेशखिंड मार्ग खुला करण्यात येणार आहे. लोकार्पणापूर्वी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह उड्डाणपुलाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आमदार शिरोळे यांनी सांगितले की, “उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठ्या प्रमाणावर सुलभता येणार असून वाहतुकीची गर्दी कमी होईल.पुणेकरांना आधुनिक व शाश्वत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यामुळे या परिसरातील महत्त्वाचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.
