Pune News : राजाराम पुल ते नांदेडसिटीपर्यंत नदी काठ होणार सुशोभित

पुणे Pune News खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला आहे.

हा प्रकल्प राजाराम पूल ते वारजे या दरम्यान होणार होता.

पण आता याची लांबी वाढवून तो नांदेडसिटी- शिवणेपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च ३०० कोटीवरून ४५० कोटीवर जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा पुढील आठवड्यात निघणार आहे अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातील साठा वाढल्याने मुठा नदीतील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे एकतानगर, विठ्ठलनगर आणि निम्बजनगर येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या भागाला भेट देत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना केल्या होत्या.

एकतानगरीत पाणी घुसू नये यासाठी राजाराम पूल ते वारजे पूल या दरम्यान नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. पण प्रकल्पाची व्याप्ती वाढवून नांदेड सिटी-शिवणेपर्यंत सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संभाव्य दरवाढ, राॅयल्टी, कर रचनेत होणारे बदल यामुळे या कामाचे पूर्वगणनपत्रत ३६९.७५ लाख इतके झाले आहे.

जीएसटीसह हा खर्च ४४९ कोटी इतका होणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ३००कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण अजून पर्यंत हा निधी महापालिकेला मिळालेला नाही. या नदीकाठ विकसन प्रकल्पामुळे पूरस्थिती नियंत्रणात येऊन एकतानगरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये –

– नदीच्या प्रवाहासाठी भिंती ९० मीटरपर्यंत रूंद केल्या जाणार.

– एकतानगर परिसरातील नाल्याभोवती सीमाभिंत उभारली जाणार.

– पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ८०० मीटर लांबीची वाहिनी बसविण्यात येणार.

– पाण्याची पातळी वाढल्यास जॅकवेलद्वारे पाणी बाहेर काढले जाणार.

– संपूर्ण प्रकल्पात ४ घाट, ४ रॅम्प आणि २ डेक तयार केले जाणार.

– स्वतंत्र पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकची सुविधा उपलब्ध होणार.