बाणेर प्रतिनिधी :: शहरातील अनेक इमारतींचे फ्रंट व साईड मार्जिन मध्ये हॉटेल थाटले असल्यामुळे अतिक्रमण तर होतच आहे पण पार्किंगचा प्रश्न देखील गंभीर होत आहे त्यामुळे अशाच मिळकतींवर कारवाई करा त्यांच्याकडून तीन पटकर वसूल करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिले आहेत.
तसेच दर महिन्याला किमान १०० मिळकती शोधून त्यांना कर लावून त्यांची वसुली सुरू करणे, वापरातील बदलांची नोंद, व्यावसायिक वापरास आलेल्या जागांची तपासणी व थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.पृथ्वीराज आणि उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी बाणेर परिसरात संयुक्त पाहणी केली. काही हॉटेल आणि निवासी इमारतींकडून मोकळ्या जागांचा अनधिकृत व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा प्रकरणांवर वाढीव कर आकारणीसाठी निरीक्षकांना निर्देश देण्यात आले.प्रत्येक निरीक्षकाला दरमहा विशिष्ट कामगिरीचे ‘लक्ष्य’ दिले जाईल आणि त्याची अंमलबजावणी तपासण्यासाठी अचानक पाहणी केली जाईल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. याशिवाय, कर वसुली सुधारण्यासाठी विभागाला ७० नवीन कर्मचारी मिळाले असून त्यांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यात मिळकतकर व्यवस्थापनात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, नोंदणीसाठीच्या ‘अॅप’मध्येही सुधारणा केली जाणार आहे.