पुणे – जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना त्याची पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलिस ठाण्यास कळवून परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.
धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरूर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करून चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.
