Pune Municiple Corporation : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना फुटली ?

Share

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सुरू असलेला प्रारूप प्रभागांचा आराखडा जाहीर होण्याआधीच प्रभागांच्या हद्दरचना कशा पद्धतीने झाल्या आहेत, यासंबंधीची जोरदार चर्चा सुरू आहे

त्यामुळे आता महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर होण्याआधीच फुटली की प्रभागांच्या रचनेबाबत सुरू असलेली चर्चा ही केवळ अफवाच आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सर्व प्रक्रिया गोपनीय असून, येत्या दि. 4 ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभागांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात हा आराखडा शासनाकडे सादर होईल. मात्र, त्यापूर्वीच गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून काही भागांतील प्रभाग कशा पद्धतीने तयार केले आहेत, याची जाहीररीत्या चर्चा सुरू आहे.

महापालिकेच्या 165 सदस्यसंख्येनुसार 42 प्रभाग तयार होणार आहेत. त्यामध्ये 39 प्रभाग चारसदस्यीय, तर तीनसदस्यीय तीन प्रभाग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील तीनसदस्यीय प्रभागांमधील एक प्रभाग मध्यवस्तीत तयार करण्यात आला. यामध्ये सोमवार पेठ-रास्ता पेठ या परिसरांचा समावेश केला असल्याची चर्चा आहे. या भागातून भाजपचे एक माजी पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीत आहेत, तर दुसरा आणखी एक तीनसदस्यीय प्रभाग मार्केट यार्ड-सॅलिसबरी पार्क व लगतचा परिसराचा करण्यात आला.

2017 मध्ये या भागाचा मिळून प्रभाग क्र. 28 तयार झाला होता. मात्र, या प्रभागात येत असलेली डायस प्लॉट झोपडपट्टी आता वगळली आहे. तर ही झोपडपट्टी आता सेव्हन लव्हज् चौकापासून खालील भागाला म्हणजेच भवानी पेठ परिसराला जोडून तशा पद्धतीचा प्रभाग करण्यात आल्याची चर्चा आहे.

डायस प्लॉट झोपडपट्टीला वगळल्यामुळे जो मार्केट यार्ड-सॅलिसबरी परिसराचा तीन सदस्यांचा प्रभाग झाला आहे, या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण पडण्याची शक्यता कमी झाली असून, या ठिकाणी भाजपचे महापालिकेतील एक माजी पदाधिकारी व सद्यःस्थितीत शहराचे एक पदाधिकारी असे दोन दिग्गज निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी रचना अनुकूल ठरणारी आहे.

याशिवाय तिसरा आणखी एक तीनसदस्यीय प्रभाग हडपसर मतदारसंघातील मगरपट्टा भागात करण्यात आल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील मांजरी बु., केशवनगर, शेवाळवाडी आणि साडेसतरानळीचा काही भाग जोडून चारसदस्यीय प्रभाग करण्यात आल्याची चर्चा आहे.

तर वडगाव शेरी मतदारसंघात येरवडा भागाचा जो जुना प्रभाग होता, त्याला आता गांधीनगरचा काही भाग जोडण्यात आला आहे. विमाननगरपासून थेट वाघोलीतील वाघेश्वर मंदिरापर्यंत प्रभाग करण्यात आला असल्याची चर्चा आहे. याशिवाय वाघोली गावचे दोन तुकडे करण्यात आले असून, त्यामधील नगर रस्त्याच्या डाव्या बाजूचा परिसर लोहगावला, तर उजव्या बाजूचा परिसर खराडीला जोडण्यात आल्याची चर्चा आहे.

याशिवाय कोथरूड मतदारसंघात बाणेर-बालेवाडी भागाला नव्यान समाविष्ट सूस, म्हाळुंगे ही गावे जोडण्यात आली असल्याची चर्चा आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी पदाधिकार्‍याला अनुकूल असलेला भाग तोडण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. उर्वरित कोथरूड मतदारसंघात तसेच मध्य वस्तीत जुन्या प्रभागांच्या रचनेत फारसे बदल झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रारूप प्रभागरचनेसंदर्भात शहरात सुरू असलेल्या चर्चा खर्‍या आहेत की केवळ राजकीय कार्यकर्त्यांकडून अफवा पसरविल्या आहेत आहेत, याचे उत्तर प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यावरच स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र, या चर्चेत तथ्य आढळल्यास प्रशासनाची गोपनीय प्रभागरचना जाहीर होण्याआधीच फुटली होती, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपामहापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेली प्रारूप प्रभागरचना गोपनीय आहे. रचनेचा आराखडा कुठेही बाहेर कळू नये, याबाबत प्रशासनाने पूर्ण दक्षता घेतली आहे. प्रभागांच्या रचनेबाबत ज्या चर्चा सुरू आहेत, त्यात काही तथ्य नाही. केवळ 2011 जनगणनेनुसार ही रचना होत असल्याने त्यावरून कशा रचना होतील याचे आखाडे मांडले जात आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *