Pune महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यांच्या आवारात खासगी वाहने उभी केली जात असल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते आणि काही रिक्षाचालकांकडूनही रुग्णालयांच्या परिसरात वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकारावर प्रभावी नियंत्रण नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना वाहनांसाठी जागा शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना घेऊन येणाऱ्या नातेवाइकांसह रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक वाहनांसाठी रुग्णालयाच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, या जागेचा वापर खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी होत असल्याने रुग्णालयातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी, रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनांना जागा मिळविणे कठीण बनत आहे.रुग्णालयांच्या आवारात वाहने उभी करणाऱ्या चालकांना सुरक्षारक्षकांकडून विचारणा केली जाते, तेव्हा काही वेळा वादावादीचे प्रसंग घडत असल्याचेही समोर येत आहे. काही वाहनचालक स्थानिक राजकीय संबंधांचा आधार घेत असल्याने सुरक्षारक्षकांना वाहने हटविण्याबाबत कारवाई करताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालय परिसरातील वाहन पार्किंगचे नियोजन आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची की महापालिकेच्या संबंधित विभागाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. रुग्णवाहिकांसाठी तसेच रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवणे, अनधिकृत पार्किंग रोखणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या आवारातील पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय कायम राहण्याची शक्यता आहे.
