Pune : रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन

pune राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या उपशहर संघटिका रेखा कोंडे, स्वाती कथलकर, विद्या होडे, सरोज कार्वेकर, स्नेहा कुलकर्णी, मृण्मयी लिमये, जयश्री भणगे यांच्यासह चार ते पाच महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेबाबत असंवेदनशील वक्तव्य केल्याचा आरोप करून शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.३१) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर दुपारी सव्वातिनाच्या सुमारास आंदोलन केले.

घोषणाबाजी करत चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, की महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवक्त्या ? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनात पोलिस परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करत आहेत.