Pune-Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्ग वर्षभरात पूर्ण होणार, नितीन गडकरी यांनी दिला शब्द

pune दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. एसआयआर, संचार साथी अॅप, नवीन कामगार कायदे यासह अन्य मुद्द्यांवरून विरोधक संसद परिसरात निदर्शने करत असून, सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत आहे. पुणे-कोल्हापूर या महत्त्वाच्या महामार्गाचा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

पुण्यातील वेस्टरली बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम आम्ही आमच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून सुरू केले आहे. पुणे ते सातारा रस्त्याचे काम करण्यासाठी सहा हजार कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या कामाचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. खंबाटकी घाटातील एक बोगदा लवकरच खुला करीत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

दीर्घकाळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे ८९ टक्के काम झाले असून येत्या एप्रिलपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. चांद्रयान मोहिमेवर जेवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च गेल्या दहा वर्षांमध्ये होऊनही मुंबई-गोवा महामार्ग नीट झालेला नाही, याकडे शिवसेना-उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते.

या महामार्गाचे काम २००९ साली सुरू झाले. त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याचे काम देण्यात आले होते. मी २०१४ साली मंत्री झालो. या रस्त्याच्या कामात भूसंपादनाचे प्रश्न होते, आतापर्यंत अनेक कंत्राटदार बदलले. अनेकदा कारवायाही झाल्या. या कामात प्रचंड विलंब झाला यात शंका नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.