पुणे प्रतिनिधी :: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापतीची निवड शुक्रवारी (ता. १८) होणार आहे. यासाठी ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिला.त्यामुळे ही निवड प्रक्रिया होणार आहे.संचालक मंडळ नियुक्तीनंतर विविध गैरव्यवहारांमुळे बाजार समिती सातत्याने चर्चेत आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच विधान परिषदेमध्ये बाजार समितीमधील गैरव्यवहारांच्या चौकशीची घोषणा केली.
तर पणन संचालकांनी देखील एक चौकशी समिती नियुक्त केली आहे.यामुळे गैरव्यवहार आणि चौकशांच्या फेऱ्यात अडकलेल्या बाजार समितीचे सभापती पद हे काटेरी मुकुट ठरणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बाजाराचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याच्या सूचना केल्याने, राष्ट्रीय बाजार झाल्यावर सभापती पद औट घटकेचे ठरणार आहे.गोव्याची झिंग उतरलीदरम्यान, सभापती पदासाठी इच्छुकांनी काही संचालकांना घेऊन गोवा गाठले होते. संचालक मंडळ गोव्यात असतानाच विधान परिषदेमध्ये बाजार समितीमधील गैरव्यवहारांचा मुद्दा गाजला आणि पणनमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिल्याचे वृत्त गोव्यात धडकले आणि संचालकांची गोव्याची झिंग उतरल्याची चर्चा बाजार आवारात रंगली होती.