चाकण एमआयडीसी वाहतूक कोंडीमुक्त व्हावी यासाठी आज पीएमआरडीवर ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
मोर्चात नागरिकांसह खासदार अमोल कोल्हे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील हे देखील सहभागी झाले. मोर्चा संदर्भात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन देण्यावरून खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
चाकण वाहतूक कोंडीमुक्त व्हाव यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी ठोस पावलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा वाहतूक कोंडीच्या संदर्भात दौरा देखील झाला. परंतु, काही प्रमाणात बदल झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे असल्याने ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून आज चाकण ते आकुर्डी पीएमआरडीएच्या कार्यलयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासह म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील, स्थानिक आमदार देखील सहभागी होते.
शेकडोच्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले होते. पीएमआरडीएच्या कार्यालयाच्या जवळ मोर्चा येताच पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात निवेदन देण्यावरून आणि मोर्चा अडवण्यावरून शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. काही मिनिटानंतर अमोल कोल्हे यांच्यासह शिवाजी आढळराव पाटील यांना पीएमआरडीएच्या कार्यालयात सोडण्यात आलं. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं आहे. चाकण वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्याबाबत पीएमआरडीएकडून आश्वासन देण्यात आल आहे.
