पुणे- पुणे महापालिकेच्या वतीने दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
महापालिकेकडून दरवर्षी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत, तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाह्य योजनेंतर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. यंदाही विद्यार्थ्यांना dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागणार आहे. १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असेल.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य दिले जाते.
याबरोबरच ७० टक्के गुण मिळवलेल्या पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेले व ५५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कचरावेचक, बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या, कचऱ्यासंबंधी काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या मुलांना किमान ६५ टक्के गुण संबंधित शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आवश्यक आहेत, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अरविंद माळी यांनी दिली.
हे लक्षात ठेवावे
- शिष्यवृत्तीसाठी dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर करा ऑनलाइन अर्ज
- राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते आवश्यक आहे.
- अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज सादर न करता ‘सेव्ह ॲज ड्राफ्ट’ असाच ठेवल्यास पुढील प्रक्रिया होणार नाही
- दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती
- अधिक माहितीसाठी १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.