PMC पुण्यात भाजपमध्ये ‘आयात’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ संघर्ष पेटला;

Pune निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची खरी ताकद. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने या निवडणुकीत निवड समितीने निष्ठावंतांना योग्य सन्मान, न्याय आणि स्थान द्यावे, अशी साद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला घातली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशामध्ये भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता सत्ता असो वा नसो, पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहतो, असे नमूद केले आहे. ही पोस्ट पदासाठी नाही किंवा विरोधातही नाही. वर्षानुवर्षे तन, मन, धन अर्पण करून पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी ही पोस्ट असल्याचे त्यात म्हटले आहे.

आज पक्षाचे दिवस बदलले, अनेक चेहरे स्वार्थासाठी बदलले तरी काही लोक अजूनही भाजपशी एकनिष्ठ आहेत. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून, निष्ठावंतांना सन्मान, न्याय आणि स्थान द्यावे. ही मागणी नसून हा आमचा हक्क आहे, असे संदेशात म्हटले आहे.

“निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पक्षाच्या बैठकींमध्ये वरिष्ठांकडे हीच मागणी मांडली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देणे हीच आमची भूमिका आहे. मात्र, प्रत्येकालाच संधी देणे शक्य नाही.”
– धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष