PMC Election शिंदेंच्या सेनेत दुफळी? युतीवरून धंगेकर, भानगिरे आमने सामने!

Pune Pmc – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही अतिरिक्त जागा भाजपला मिळाव्यात यासाठी पुणे शहरातील काही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोडल्या जाऊ शकतात.

महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अलिकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपबरोबरच्या युतीबाबत तितके सकारात्मक दिसले नाही. ते म्हणाले, “भाजपकडून आम्हाला फक्त 30 ते 35 जागाच दिल्या जाणार असतील, तर ते आम्हाला अमान्य आहे. आम्ही अधिक जागांची अपेक्षा करतो; अन्यथा पुणे महापालिकेतील सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उतरवून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. शहर प्रमुख नाना भानगिरे युतीच्या बाजूने प्रयत्न करत असतानाच धंगेकरांच्या या भूमिकेमुळे महायुतीत अडथळा निर्माण झाला आहे.

शिंदे गटाकडे भानगिरे यांच्यासह फारसे प्रभावी नगरसेवक नसल्याने शहरातील पक्षाची स्थिती कमकुवत दिसते, अशा स्थितीत भाजपशी युती करणे शिंदे गटाच्या शिवसेनेला लाभदायक ठरू शकते. तरीही धंगेकर 35 पेक्षा अधिक जागांवर ठाम राहिले तर युती धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

शहराध्यक्ष आणि महानगरप्रमुख यांच्यातील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असला, तरी युतीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील हा अंतर्गत वाद कुठल्या दिशेने वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.