पिंपरी-चिंचवडचे महापौरपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी आरक्षित; शहराध्यक्ष काटेंचा मार्ग मोकळा

PCMC पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी ‘सर्वसाधारण’ (General) प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. राज्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एकूण २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली.

महापालिकेतील सध्याच्या राजकीय समीकरणानुसार १२८ जागांच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीला ८४ जागांवर विजय मिळाला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ३७ जागा असून, शिवसेना (शिंदे गट) ६ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे.

पुढील प्रक्रिया काय?

आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता विभागीय आयुक्तांमार्फत महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना महापौरपदासाठी अर्ज दाखल करावे लागतील. साधारणतः पुढील १५ दिवसांच्या आत विशेष सभा बोलावून नवीन महापौरांची अधिकृत निवड केली जाणार आहे. 

शत्रुघ्न काटे महापौर पदाचे प्रबळ दावेदार..

महापौरपद खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. मात्र या सगळ्यात आघाडीचे नाव शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचे आहे. गेल्या पंचवार्षिक मध्येही महापौर पदाच्या शर्यतीत ते शेवटपर्यंत पुढे होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले होते. आता त्यांच्या नेतृत्वात पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली असून यावेळी ते महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.