Phaltan Doctor Death Case: ”आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नाही, डॉक्टर भगिनीचा पुतळा उभारणार”, रामराजे नाईकांची घोषणा

pune महिला डॉक्‍टरची आत्‍महत्‍या ही घटना दुर्दैवी आहे. फलटण तालुक्‍याच्‍या बाराशे वर्षांच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नाही. या घटनेचे आपल्‍याला राजकारणही करायचे नाही; पण प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी माझे नाव घेतले आहे.

त्‍यांचं वय वाढलंय; पण बुद्धी अजिबात वाढली नाही. आता तुम्‍हाला शंभर कोटींची नोटीस पाठवणार, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी केला.

होळ (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्‍या शताब्‍दी सोहळ्यानिमित्त झालेल्‍या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष संजीवराजे निंबाळकर यांच्‍यासह विविध मान्‍यवर उपस्‍थित होते. रामराजे पुढे म्‍हणाले, ”प्रल्हादरावांचे ज्येष्ठ चिरंजीव धनंजय माझ्याकडे पंधरा वेळा आले होते. १५ वेळा बँकेत जाऊन बसलो होतो, की यांचे कर्ज पुढे कसे जाईल. अशी कामे मी त्यांच्यासाठी केली आहेत; परंतु प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी माझ्यावरच आरोपाचे शिंतोडे उडवले, ते मी कदापिही सहन करणार नाही.”

”फलटणमधील घटनेने नाईक-निंबाळकर यांचे नाव देशात नव्हे, तर जगात खराब केले गेले आहे. प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचं कधीही मी वाईट केलं नाही. शंभर ते दीडशे कोटींचे कर्ज मी वाचवले. तुम्ही माझा फोटो तुमच्या देवघरात लावावा व माझी पूजा करावी, इथपर्यंत मी तुमच्यासाठी केलं होतं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सुद्धा मला, रामराजे तुम्ही या प्रकरणात पडू नका, असे सांगितले होते. तरीही मी माझ्या तालुक्यातील आहेत, यासाठी प्रयत्न केले.” असं रामराजे म्हणाले. यावेळी संजीवराजे यांनीही मार्गदर्शन केले.

यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही

महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍येची जी घटना घडली, ती घटना आपल्या परिसरात १२०० वर्षांच्‍या इतिहासात घडली नव्‍हती. शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर झाली. रुग्णांना सेवा देण्यासाठी येथे आली. तिने येथे एका आलिशान हॉटेलवर आपलं आयुष्य संपविले, तेव्हा तिच्या भावाला काय वाटले असेल. यात मला अजिबात राजकारण करायचे नव्हते; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले अन् यांना हुरूप आला; परंतु खूप मोठा कलंक आपल्याला लागला आहे. तो कसा पुसून काढायचा? मी कुठंच म्हटलं नाही, यांना अटक करा; पण त्याचं मन त्यांना खातंय. तिच्या मृत्यूने आता कोणीही अधिकाऱ्यांना फोन करीत नाहीत. तिचा अर्धपुतळा त्या उपजिल्हा रुग्णालयातील आवारात उभारा. नाही तर मी स्वखर्चाने अर्धपुतळा बांधून देईल, असे सांगताना यापुढे भाऊबीज करणार नाही, अशी संवेदनाही रामराजे यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.