पुणे प्रतिनिधी :: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
लातूरमध्ये घडलेल्या गंभीर आणि निषेधार्ह मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने तात्काळ कठोर पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र सुनील तटकरे यांना निवदेन दिल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. मात्र सूरज चव्हाणच्या राजीनाम्याने आम्ही समाधानी नाही आहोत, कारण आमची मुख्य मागणी कृषीमंत्र्यांना बडतर्फ करण्याची होती, असं विजयकुमार घाडगे यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं. त्यामुळे आता कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाल्याचेही घाडगे म्हणाले.
“सुरज चव्हाणच्या राजीनाम्याचा काय संबंध? त्यांच्या राजीनाम्याची आमची मागणीच नव्हती. त्यांनी राजीनामा दिला आणि आम्ही समाधानी होऊ असं कोणतं पद आहे त्यांच्याकडे. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी होती. त्या कृषिमंत्र्यांना तुम्ही बडतर्फ करा. अशा लोकांना राजीनामा द्यायला सांगून आमचा तोंडाला पानं पुसता आहात का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पदावरून काढून टाकले पाहिजे ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची जी अवहेलना सुरू आहे ती थांबली पाहिजे,” असं विजयकुमार घाडगे म्हणाले.