Pune Bjp निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांत सुरुवात होईल. त्याआधीच भाजपने पुणेमध्ये मोठा डाव टाकत विरोधी पक्षांची ताकद कमी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत या पक्षातील दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पुण्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्या वेळ अमावस्य असल्याने हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. आजचा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून त्यासाठी पुण्यातून प्रवेश करणारे नेते कार्यकर्त्यांसाठी लवकरच रवाना होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल त्यांचे पुत्र हेमंत बागुल तसेच सध्या राष्ट्रवादीत असलेले विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे त्यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते यामध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
