नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Share

पुणे प्रतिनिधी (Lokmanya Tilak National Award) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे यावेळी उपस्थित असतील. प्रारंभी लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले ,कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल. ( Nitin Gadkari to receive this years Lokmanya Tilak National Award)


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *