Pune अजित पवार यांचं बुधवारी २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असला तरी आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार?
खरं तर, शरद पवारच सुनेत्रा पवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. राष्ट्रवादी विलीनीकरणाचा अंतिम निर्णय घेतील, असे शुक्रवारी दुपारपर्यंत म्हटले गेले. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली. पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाविषयी सर्वानुमते ठरवू, असं त्यांनी म्हटलं होतं. पण विधानसभेला अजित पवारांचे हे राजकीय सल्लागार म्हणून काम केलेले नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांशी संपर्क साधला आणि काही मिनिटांतच राजकीय चित्र बदलले. आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहोत, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर भुजबळांनी माध्यमांना माहिती दिली.
नरेश आरोरा हे अजित पवारांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं कॅम्पेन राबवण्याची सगळी जबाबदारी आरोरा यांच्याकडे होती. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचं ‘पिंक कॅम्पेन’ चालण्यामध्ये प्रमुख भूमिका नरेश आरोरांची होती. ते राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर फारसा राजकीय अनुभव नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी नरेश आरोरांनीच फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे.
