पुणे शहरामध्ये निधीची कमतरता नसतानाही नियोजनबद्ध विकास झालेला नाही. पुणेकरांना सोयीसुविधा देण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी लॉन्ग टर्मचा विचार करून नियोजनबद्ध कारभार करणे आवश्यक होतं..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सडकून टीका केली.
राज्यात एकत्र सत्तेत असलेले महायुतीतील मित्रपक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने आले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी असे सलग दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुणे शहराकडे मोर्चा वळवला. संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या सगळ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
नवले ब्रिजच काही बोलायला नको, सिंहगड रोडवरील फ्लायओवरचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने आता तिथे तोडफोड करावी लागणार आहे. पुण्यातील कारभारी लोक कमी पडली म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्याचे शिल्पकार म्हणतात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला.
