रस्त्याला आडवा येणारा बंगला ट्राफिकसाठी स्वखुशीने पाडला; नागरिकांकडून कौतुक
Pune Update News :: बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे येथील नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः राधा चौक आणि राष्ट्रीय महामार्गाखालील पुलाजवळ दररोज कोंडी होते.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या कानावर घातले त्यानंतर लगेचच पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या त्यानंतर काम वेगाने सुरू झाल्याचे दिसून आले.
बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वाटीका सोसायटी ते रणभूमी स्पोर्ट्स अकॅडमी, पारितोष सोसायटी, मंत्रा मोनार्च सोसायटीकडे जाणारा 30 मीटर रुंदीचा रस्ता जलद गतीने आकार घेत आहे. या रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे कामात कोणताही विलंब न होता प्रगती होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी येणारा श्री राकेश बालवडकर यांचा बंगला त्यांच्या स्वखुशीने व परवानगीने पाडण्यात येत आहे, तर पुढील टप्प्यात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या शेतीचे अधिग्रहण करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याशी संवाद सुरू असून आवश्यक पत्रव्यवहारही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
हे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर हा 30 मीटरचा प्रशस्त रस्ता थेट मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे बालेवाडी वरुन मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळ आणि त्रास दोन्ही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुराव्यानंतर आता जलद गतीने पुढे सरकत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर बालेवाडी परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारा हा रस्ता ठरणार आहे. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुणे स्थायी समितीची माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी आभार व्यक्त केले.
