Murlidhar Mohol : विमानात पत्नीच्या शेजारी जागा मिळाली नाही, भाजपाच्या नेत्याची थेट मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

Share

पुणे प्रतिनिधी (Murlidhar Mohol) विमानात पत्नीच्या शेजारी बसण्यासाठी जागा न दिल्याने पुणे भाजपाच्या एका नेत्याने थेट केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पत्रात लिहिले आहे की, “मुरलीधर मोहोळ आपण एक कार्यतत्पर मंत्री आहात, अशी आपली ख्याती आहे. सध्या वारंवार इंडिगो विमान सेवेबाबत माध्यमातून वाचायला मिळत आहे व अनेकदा उड्डाण झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे पुन्हा लँडिंग झाल्याच्या बातम्या देखील येत आहेत. मी या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की, त्वरित इंडिगोच्या प्रमुखांची बैठक आयोजित करावी व सामान्य प्रवाश्यांच्या तक्रारी दूर कराव्यात.”

“इंडिगोच्या विमानाने 13 जुलैला नैरोबीसाठी उड्डाण केल्यावर माझे आसन हे मागे जात नव्हते. पण, हवाईसुंदरींनी (एअर होस्टेस) ते रिलेक्स अवस्थेत करून दिले व विमान नैरोबीला उतरताना देखील त्यांनीच पुढे प्रयत्नपूर्वक करून दिले. नैरोबी ते मुंबई उड्डानादरम्यान पण असाच अनुभव आला व हवाई सुंदरीने (एअर होस्टेस) खूप प्रयत्न करून देखील (सीट नंबर E 23) त्यांना जमले नाही व त्यांनीच मला तक्रार करायला सांगितले. त्यामुळे विमानाच्या देखभालीचा (मेंटेनन्स) विषय ऐरणीवर आला आहे. नैरोबी येथून इंडिगोने प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलो असता बॅगेज बेल्टवर बॅग घेण्यास गेलो असता बहुतांश बॅग या पावसात भिजलेल्या आढळून आल्या, त्या भिजू नयेत याची संबंधित कंपनीने दक्षता घेणे गरजेचे वाटते,” असे खर्डेकर यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.

“आपल्याला कल्पना असेल की विमानाच्या लँडिंगच्यावेळी झटके बसून प्रवाश्यांचे डोकं आपटू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. त्यासाठी खुर्ची पुढे घेण्यासाठी विमान कंपन्या प्रचंड आग्रही असतात. विमान कंपनीचे पोर्टर म्हणजे बॅग भरून विमानात ठेवणारे व नंतर काढून बॅगेज बेल्टवर सोडताना ते नीट हाताळणी करत नाहीत. त्यामुळे बॅग खराब होणे, महागड्या बॅगला पोचा पडणे असे प्रकार घडतात. त्यामुळे हाताळणी नीट करण्याबाबत विमान कंपन्यांना समज द्यावी. 21 सप्टेंबर 2024 ला माझ्या नातेवाईकांना आलेला अनुभव तर अत्यंत क्लेशकारक असून त्यांची केवळ बॅग नादुरुस्त झाली. असे नव्हे तर तर बॅगेतील नेकलेस देखील गायब झाले. याबाबत तक्रार केल्यावर इंडिगोने अवघे 2000 रुपये बॅगेची नुकसानभरपाई देणे मान्य केले व नेकलेसबाबत मात्र जबाबदारी झटकली. त्यामुळे याबाबत ही संबंधित कंपनीला समज द्यावी व यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यास सांगावे,” अशी व्यथा खर्डेकर यांनी मांडली.

“पैसा कमविण्याच्या नादात संबंधित विमान कंपनी ऑनलाइन सीट कन्फर्मेशन करताना खिडकीच्या किंवा पुढच्या पसंतीच्या सीटसाठी (जागेसाठी) अतिरिक्त पैसे मागते इथपर्यंत ठीक आहे. मात्र, विमानतळावर चेक इन करताना नवरा बायकोला वेगवेगळ्या सीट (जागा) दिल्या जातात, यात बदल व्हायला हवा. मला ही मुंबई नैरोबी प्रवासात हाच अनुभव मुंबई विमानतळावर आला. तेथील इंडिगो प्रतिनिधी अंजली चौधरी यांनी या लांबच्या प्रवासात मला व पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले. त्यांना विनंती केली असता, ‘मी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, सह प्रवाश्याशी बोलून जागा बदलून घ्या,’ अशी उत्तरे दिली. तरी या प्रक्रियेत बदल व्हावा ही आग्रही विनंती. तसेच प्रवासादरम्यान त्यांचे कर्मचारी मराठीत बोलत नसल्याचेही निदर्शनास आले किंबहुना त्यांच्या विमानांतर्गत उद्घोषणेतही मराठीचा वापर दिसून येत नाही. किमान महाराष्ट्रात येणाऱ्या वा जाणाऱ्या विमानातून एका कर्मचाऱ्याने तरी मराठी बोलावे,” अशी मागणीही खर्डेकर यांनी मोहोळ यांच्याकडे केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *