Mumbai Express Way: मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार, तारीख आली समोर

Pune newz : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वास येत असून, एक मेपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक कोंडी टळेल. शिवाय प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल.

मात्र, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत बोगद्यातून ज्वलनशील, अतिज्वलनशील इंधनाची व घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बोगद्यात प्रवेश नसेल.

‘मिसिंग लिंक’च्या बोगद्याचा समावेश आंतरराष्ट्रीय ‘एडीआर’च्या (धोकादायक मालवाहतुकीचे जागतिक सुरक्षा नियम) मानकांनुसार ‘ई’ वर्गवारीमध्ये समाविष्ट झाला आहे. त्याआधारे ज्वलनशील इंधनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बोगद्यात प्रवेश नाकारला आहे. यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’ लवकरच वाहतूक व महामार्ग पोलिसांना पत्र देणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बोगदा १० किलोमीटरहून अधिक लांबीचा आहे. ‘एडीआर’च्या मानकांनुसार, अतिसंवेदनशील आणि लांब बोगद्यांमध्ये स्फोटक पदार्थांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याच नियमाचा आधार घेत बोगद्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस यांसारखे अतिज्वलनशील पदार्थ आणि घातक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश पूर्णपणे नाकारण्यात आला आहे.

महामार्ग पोलिसांना लवकरच पत्र

या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’कडून (एमएसआरडीसी) पावले उचलण्यात येत आहेत. लवकरच वाहतूक पोलिस आणि महामार्ग पोलिसांना अधिकृत पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या पत्रानंतर पोलिसांकडून वाहनांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गावरून वाहतूक करण्याच्या सूचना टँकर चालकांना देतील.

प्रवास होणार सुरक्षित अन् सुखकर

द्रुतगती मार्गावरून दररोज सुमारे दोन हजार ज्वलनशील टँकर प्रवास करतात. या नव्या नियमामुळे इंधन टँकर आणि धोकादायक रसायनांच्या गाड्या बोगद्यातून प्रवास करणार नाहीत. परिणामी, सामान्य प्रवाशांचा पुणे-मुंबई प्रवास केवळ जलदच नव्हे, तर अत्यंत सुरक्षित होणार आहे. एक मेपासून मार्ग खुला झाल्यानंतर प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

‘हाय-टेक’ सुरक्षा

  एखाद्या प्रतिबंधित टँकरने नियम मोडून बोगद्यात शिरण्याचा प्रयत्न केल्यास त्याला रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज असेल.

  बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच ‘आयटीएमएस’ व ‘एनपीआर’ कॅमेरे बसविण्यात येतील, त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनाची माहिती काही सेकंदात नियंत्रण कक्षाला मिळेल.

  जर चुकून बोगद्यात एखाद्या वाहनातून इंधन किंवा तेल गळती झाल्यास संपूर्ण बोगद्यात पसरू नये, यासाठी ‘स्लॉट गटर्स’ विशेष सांडपाणी व्यवस्था केली आहे.

  बोगद्याच्या काँक्रीटची अग्निरोधक क्षमता (फायर रेटिंग) सुमारे हजार ते बाराशे डिग्रीचे तापमान सहन करण्याची आहे. एक ते दोन तास तापमान सहन करतील एवढी क्षमता आहे. त्यामुळे बोगद्यात आग लागल्यास बोगद्याचे कमीत कमी नुकसान होईल.

  आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी दर ३०० मीटरच्या अंतरावर वीसहून अधिक ‘क्रॉस पॅसेज’ दिले आहेत.