Mumbai CNG Supply disrupts: मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सीएनजीचा ठणठणाट, अनेक पंपांवर सीएनजी नाही

CNG shortage in Mumbai, Thane, Navi Mumbai: मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या बिघाडामुळेच सीएनजी पंपांवर सीएनजीचा पुरवठा होत नाहीये. परिणामी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रविवारी दुपारपासून सीएनजीच्या मुख्य पाईपलाईनला नुकसान झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानीत सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ओला आणि उबर सारख्या कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या बहुतेक कार, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी तसेच सार्वजनिक वाहतूक कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या काही बसेस एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वर अवलंबून आहेत. पण आता सीएनजी पंपावर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडाळा येथील गेल (भारतीय गॅस प्राधिकरण) च्या मुख्य गॅस पुरवठा पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडामुळे एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) चा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. सीजीएस वडाळा येथे गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे आणि परिणामी एमजीएल पाईपलाईन नेटवर्क बंद पडल्यामुळे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील सीएनजी पंपांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. हा बिघाड तात्काळ दुरुस्त करुन सीएनजी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कंपनीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कंपनीने गॅस पुरवठा कधी पूर्ववत होईल हे स्पष्ट केले नाही, तसेच महत्त्वाच्या पाइपलाइनला झालेल्या नुकसानीचे कारण देखील स्पष्ट केले नाही. एमजीएलने प्रभावित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधनांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईतील अनेक गॅस पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल असेही महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे.